राज्यात दुष्काळाचे दोन टप्पे;पुणे विभागातील इंदापूरसह अनेक तालुक्यांचा समावेश.

विजय शिंदे
कृषी विभागाचा अहवाल सरकारकडे; पुणे विभागातील इंदापूरसह अनेक तालुक्यांचा समावेश
पुणे : राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील दुष्काळ दोन टप्प्यांत जाहीर करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने अहवाल सरकारकडे सादर केल्याची माहिती आहे. दरम्यान, दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी संबंधित तालुक्यांची यादी महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राकडे (MNCFC) पाठविण्यात आली आहे.
राज्यातील एकूण १३७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक भागांत पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा अधिक राहिला असून, काही भागांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, राज्यातील १७५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दुष्काळाचा पहिला ट्रिगर म्हणजे काय?
दुष्काळाचा पहिला ट्रिगर निश्चित करताना जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमानाचा विचार केला जातो. यामध्ये पर्जन्यमानातील घट, पावसातील खंड तसेच जून-जुलै महिन्यांतील सरासरी पावसाची टक्केवारी यांसारख्या बाबींचा विचार केला जातो.
पावसाचा खंड हलकी जमीन असलेल्या भागात किमान २१ दिवस, तर भारी जमीन असलेल्या भागात २८ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास दुष्काळी परिस्थितीच्या निकषांमध्ये त्याचा विचार केला जातो.
जिल्हानिहाय जमिनीचे वर्गीकरण करून हलकी व भारी जमीन यानुसार पावसाच्या खंडाचा विचार करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुणे विभागातील कोणते तालुके?
पहिल्या ट्रिगरसाठी विचाराधीन असलेल्या तालुक्यांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, राजगुरूनगर, शिरूर (घोडनदी), बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर (सासवड) या तालुक्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या तालुक्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या अहवालानंतर शासनाकडून पुढील कार्यवाही काय होते आणि कोणत्या तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला जातो, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.



