लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन असेल तर मी भाजपसोबत; राहुल मखरेंची भूमिका

तहसीलदार बनसोडेंविरोधातील आंदोलनापेक्षा SIR मधून विरोधी मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याला प्राधान्य; भाजपला थेट सवाल
इंदापूर | विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल मखरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तहसीलदार बनसोडे यांच्याशी आपले मतभेद असून त्यांच्या विरोधात आपण आंदोलनही केले आहे. मात्र, लोकशाही वाचवणे आणि तहसीलदारांच्या विरोधातील आंदोलनाला समर्थन देणे, असे दोन पर्याय समोर असतील तर आपण लोकशाही वाचवण्यालाच प्राधान्य देऊ, असे मखरे यांनी स्पष्ट केले आहे.
SIR प्रक्रियेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सुमारे आठ हजार विरोधी मतदारांची नावे कमी करण्यासाठी काही लोकांनी अर्ज दिल्याचा आरोप करत, अशा लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपने केली तर त्या आंदोलनात आपण सहभागी होऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
बहुजन समाजातील तरुणांचा वापर SIR फॉर्म भरून घेण्यासाठी किंवा नमुना क्रमांक 7 च्या अर्जावर सह्या घेऊन विरोधी मतदारांची संख्या कमी करण्यासाठी केला जात असेल, तर त्याला आपला तीव्र विरोध राहील, असेही मखरे यांनी म्हटले आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी भाजपला थेट सवाल उपस्थित केला आहे. विरोधी मतदारांची संख्या कमी करण्यासाठी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप तहसीलदारांकडे करणार आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच तहसीलदार बनसोडे यांच्या विरोधातील आंदोलनाला १५ दिवसांची स्थगिती देऊन प्रथम कथितरीत्या विरोधी मतदारांची नावे कमी करण्यासाठी अर्ज देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करावी. त्यानंतर तहसीलदारांच्या विरोधातील आंदोलन पुन्हा सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“असे करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे,” असे स्पष्ट सांगत राहुल मखरे यांनी या संपूर्ण प्रकरणात लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांना प्राधान्य देणारी भूमिका घेतली आहे.
मखरे यांच्या या पोस्टमुळे इंदापूर तालुक्यातील SIR प्रक्रिया, कथित आठ हजार मतदारांच्या नावांबाबतचे अर्ज आणि तहसीलदारांविरोधातील आंदोलन या मुद्द्यांवर राजकीय चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.



