सुनेत्रा पवारांचा निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरला! जिल्हा परिषदेत सत्ता, निधी वाटपात मात्र आमदारांना अधिक प्राधान्य?

जिल्हा परिषद सदस्यांना २० टक्के, आमदारांना ४० टक्के निधी
खासदार व विधान परिषद सदस्यांना प्रत्येकी १० टक्के; पालकमंत्र्यांच्या अधिकारात ३० टक्के निधी – पुणे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण
विजय शिंदे
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधी वाटपासाठी नवे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा असून, या सूत्रानुसार जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला २० टक्के निधी, तर आमदारांना तब्बल ४० टक्के निधी मिळणार असल्याचे समोर आले आहे. खासदार आणि विधान परिषद सदस्यांसाठी प्रत्येकी १० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला असून, उर्वरित ३० टक्के निधी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अधिकारात राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निधी वाटपाच्या सूत्रामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही ७३ जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला तुलनेने कमी निधी येणार असल्याने सदस्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेत सत्ता, निधी वाटपात मात्र आमदारांना अधिक प्राधान्य?
जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असतानाही विकासकामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना आमदारांच्या तुलनेत निम्माच निधी मिळणार असल्याचे या सूत्रातून स्पष्ट होत आहे. आमदारांना ४० टक्के, तर जिल्हा परिषद सदस्यांना २० टक्के निधी देण्याच्या प्रस्तावित रचनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या निधी अधिकारांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतही आमदारांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक आमदारासाठी २५ किलोमीटर रस्त्यांचा कोटा निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
सदस्यांच्या नाराजीचा सूर उमटणार?
जिल्हा परिषदेत सत्ता असूनही विकासकामांसाठी निधीचे अधिकार मर्यादित राहणार का, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांमधून उपस्थित होण्याची शक्यता आहे. निधी वाटपाच्या या सूत्रावर सदस्य काय भूमिका घेतात, सत्ताधारी पक्षातील नाराजी उघडपणे समोर येते का आणि आगामी काळात निधी वाटपाच्या निर्णयात काही बदल होतात का, याकडे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



