इंदापूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन मिळणार!

इंदापूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन मिळणार!
अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी योजना सुरू; ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करण्याचे आवाहन
इंदापूर (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी इंदापूर तालुक्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे पात्र महिला व गरजू नागरिकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या २० टक्के निधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, गटविकास अधिकारी सचिन खुडे व उपसभापती जयकुमार कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करण्यात आला असून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याने यापूर्वी पंचायत समितीच्या सेस निधीतून किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शिलाई मशीनचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जासोबत आवश्यक पात्रता कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
दरम्यान, ही योजना मंजूर करून कार्यान्वित केल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल बाबा जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवडे यांचे इंदापूर पंचायत समितीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
इंदापूर तालुक्यातील इच्छुक व पात्र नागरिकांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ग्रामपंचायतीमार्फत किंवा पंचायत समिती कार्यालयात लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहन सभापती हर्षवर्धन लोंढे व गटविकास अधिकारी सचिन खुडे, वडापुरी पंचायत समितीच्या सदस्य अर्चना खबाले यांनी केले आहे.



