Uncategorized

ई-पीक पाहणीच्या सर्व्हर समस्येमुळे शेतकरी अडचणी;गावोगावी कॅम्प घेऊन पीक पाहणीची नोंद करण्याची मागणी.

विजय शिंदे

  महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी (DCS) अर्थात Digital Crop Survey ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद करणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी तसेच सर्व्हरची समस्या निर्माण होत असल्याने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक पाहणीची नोंद करण्यात अडचणी येत आहेत.

काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्याने त्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होणे अवघड जात आहे. तर ॲपमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरच्या समस्येमुळे नोंदणीची प्रक्रिया रखडत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

पीक पाहणीची नोंद वेळेत न झाल्यास भविष्यात शासनाच्या विविध योजना, नुकसानभरपाई अथवा पिकांशी संबंधित शासकीय मदतीपासून काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

याबाबत भाटनिमगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्रीमंत खबाले म्हणाले की, “ई-पीक पाहणीची नोंद करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काहींकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, तर काही ठिकाणी सर्व्हर आणि ॲपच्या तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गावोगावी विशेष कॅम्पचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या पीक पाहणीची नोंद करून घ्यावी.”

“आधीच शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत असून आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक कारणांमुळे एखादा शेतकरी पीक पाहणीच्या नोंदीपासून वंचित राहिला, तर त्याला भविष्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादा शेतकरी वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाने तातडीने गावोगावी कॅम्प घेऊन सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंद पूर्ण करून घ्यावी,” अशी मागणी श्रीमंत खबाले यांनी केली.

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन महसूल व कृषी विभागाने समन्वयाने विशेष मोहीम राबवून पीक पाहणीची नोंद पूर्ण करून घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button