पुणे शहर व जिल्ह्यातील रखडलेल्या कामांना कालबद्ध गती द्या : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

विजय शिंदे
दिशा समिती बैठकीत मेट्रो, आवास योजना, भारतनेट, जलजीवन मिशनसह विविध प्रकल्पांचा आढावा
पुणे शहर आणि जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या विविध योजना व विकास प्रकल्पांची प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून त्यांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत चांदणी चौक-घोटवडे फाटा-पिरंगुट-हिंजवडी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या प्रस्तावांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
वनाज-चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती, रामवाडी-वाघोली मार्गिकेच्या आराखड्याला मान्यता आणि लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा डीपीआर निश्चित मुदतीत पूर्ण करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला खासदार सुप्रिया सुळे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्याचे निर्देश
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत पुणे महापालिकेकडे प्राप्त अर्जांपैकी ३ हजार २२७ अर्ज पात्र ठरले आहेत. मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी येथील सुमारे ६ हजार ८०० घरांच्या भूसंपादन व हस्तांतरण प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्रामीण आवास योजनेत दुसऱ्या टप्प्यातील ३८ हजार ४६५ घरांपैकी ९ हजार २५८ घरे पूर्ण झाली असून, उर्वरित घरांसाठी प्रत्येक तालुक्याला मासिक उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणार भारतनेट
भारतनेट योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १ हजार ४०० ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी तालुकानिहाय व वर्षनिहाय कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर भारतनेट उद्योजकांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जलजीवन मिशनची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करा
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १ हजार २३९ योजना सुरू असून, अद्याप ३९ हजार २५५ नळजोडण्या शिल्लक आहेत. ही कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग
पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत सुमारे ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय इंद्रायणी व पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प, भारतीय विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, भूजल सर्वेक्षण, जलशक्ती अभियान आदी केंद्र पुरस्कृत योजनांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करून प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिले.



