Uncategorized

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी भाजपची ‘फुल्ल तयारी’; सर्व जागा लढविण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांची माहिती.

विजय शिंदे

शेतकरी सभासद व कार्यकर्ता मेळाव्यात संपूर्ण पॅनेल उभे करण्याचा निर्णय; चंदरअण्णा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली रणनीतीवर चर्चा

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सोमेश्वरनगरच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सभासद व कार्यकर्ता मेळाव्यात कारखाना निवडणूक संपूर्ण पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याचा आणि सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा तावरे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कारखान्याच्या आगामी निवडणुकीसंदर्भात शेतकरी, सभासद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे, डॉ. नितीन सावंत यांच्यासह बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा परिसरातील भाजपचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.

बैठकीत कारखाना निवडणुकीची दिशा, पॅनेलची रचना, उमेदवार निवड आणि आगामी निवडणूक रणनीती यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सभासद व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपूर्ण पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

या निर्णयामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, भाजपने निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात उमेदवारांची निवड, पॅनेलची घोषणा आणि प्रचाराची दिशा याकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button