Uncategorized

मतदार यादी पुनरीक्षणात पारदर्शकता हवी, कोणावरही विनाकारण आक्षेप नको : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

विजय शिंदे

तीनही पक्ष समन्वयाने काम करत आहेत; एसआयआर उपक्रम यशस्वीपणे राबविणार असल्याचा विश्वास

इंदापूर : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमावरून इंदापूरमध्ये व्हायरल झालेल्या व्हॉईस क्लिपच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. मयत मतदार तसेच लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलींची नावे मतदार यादीतून कमी झाली पाहिजेत. मात्र, नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले असले तरी त्यांचे घर, शेती आणि रेशन कार्ड गावातच आहे, अशा नागरिकांचे मतदान गावात कायम राहिले पाहिजे. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, हाच महायुती सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही हीच भूमिका आहे. त्यामुळे निश्चितच एसआयआर हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, असा विश्वासही भरणे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, महायुतीमधील तीनही पक्ष समन्वयाने काम करत आहेत. याबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही. मात्र, खालच्या पातळीवर काही लोक विनाकारण या विषयाचे भांडवल करून राजकारण करत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, वरच्या पातळीवर तीनही पक्षांमध्ये समन्वय आहे. जे खरं आहे ते खरं आणि जे खोटं आहे ते खोटं आहे. त्यामुळे विनाकारण कोणावरही आक्षेप घेऊ नयेत.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत पात्र मतदारांवर अन्याय होऊ नये आणि अपात्र नावे वगळली जावीत, यासाठी पारदर्शक पद्धतीने काम होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत प्रत्यक्ष कामावर भर देण्याची भूमिका कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button