Uncategorized

झगडेवाडीच्या श्रुती झगडेची राज्यस्तरीय बाल संसद प्रतिनिधी म्हणून निवड!

विजय शिंदे

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बालस्नेही ग्रामपंचायत झगडेवाडी येथील विद्यार्थिनी कु. श्रुती भाऊ झगडे हिची राज्यस्तरीय बाल संसदेत बाल संसद प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. यशदा, पुणे येथे २० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बाल संसदेत तिने सहभाग घेत बालकांचे हक्क आणि शिक्षण या विषयांवरील महत्त्वाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.

बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ, यशदा आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून बालस्नेही उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत झगडेवाडीची बालस्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून प्रत्येकी तीन विद्यार्थी अशा एकूण १०२ विद्यार्थ्यांची युनिसेफ आणि यशदा यांच्या वतीने बाल संसद प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. या प्रतिनिधींची बाल संसद २० नोव्हेंबर रोजी यशदा, पुणे येथे पार पडली.

लोकसभा आणि विधानसभेत ज्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न मांडले जातात, त्याच धर्तीवर बाल संसदेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले जावेत, त्यांच्या समस्या समजून घेतल्या जाव्यात आणि त्यावर उपाययोजना व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या समस्या, विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क तसेच गावपातळीवरील बालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

या बाल संसदेत कु. श्रुती भाऊ झगडे हिने बालकांचे हक्क आणि शिक्षण या विषयांवर अत्यंत प्रभावीपणे प्रश्न मांडत आपले प्रतिनिधित्व केले. तिच्या या निवडीमुळे झगडेवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

श्रुतीच्या या निवडीसाठी ग्रामपंचायत झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे,उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद तसेच जिल्हा परिषद शाळा झगडेवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच श्रुतीचे वडील भाऊ झगडे सर यांचेही या यशामध्ये मोलाचे योगदान राहिले.

श्रुतीच्या या निवडीबद्दल ग्रामपंचायत झगडेवाडी, शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांकडून तिचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button