इंदापूरमध्ये २९ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ.

विजय शिंदे
इंदापूर : शहरातील अंबिकानगर परिसरात २९ वर्षीय डॉक्टरने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. डॉ. अवधूत विठ्ठल खबाले (वय २९, रा. अंबिकानगर, इंदापूर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. मेडिकल व्यावसायिक प्रताप छगन खबाले यांना त्यांचे बंधू डॉ. शिवाजी खबाले यांनी फोनद्वारे घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने डॉ. अवधूत खबाले यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, डॉ. अवधूत खबाले यांच्या वडिलांचे सुमारे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ते मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. डॉ. खबाले हे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून इंदापूर परिसरात आपली ओळख निर्माण करीत होते.
तरुण डॉक्टरच्या अचानक निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह इंदापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव करीत आहेत.



