इंदापूर तालुक्यातील १,०५५ दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड; ३६.९२ लाखांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा!

विजय शिंदे
इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘५ टक्के दिव्यांग कल्याण निधी’ योजनेतून इंदापूर तालुक्यातील १,०५५ दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीचे एकूण ३६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा करण्यात आले आहे.
ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान जमा झाल्याने तालुक्यातील दिव्यांग बांधवांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. सणासुदीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पात्र दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत अनुदान वेळेत पोहोचावे, यासाठी पंचायत समिती इंदापूरच्या वतीने नियोजन करण्यात आले. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक वैभव नाळे, अर्थ विभागाचे कॅशियर किरण गायकवाड आणि सहाय्यक लेखाधिकारी सोमनाथ मोहिते यांनी अनुदान वितरणाची प्रक्रिया तत्परतेने पूर्ण केली.
शासनाच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचत असल्याने दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार मिळत आहे. दिवाळीच्या सणात मिळालेल्या या मदतीमुळे इंदापूर तालुक्यातील १,०५५ कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



