Uncategorized

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पिटकेश्वर ग्रामपंचायतीचा सहभाग; माजी पदाधिकारी, सोसायटी संचालकांसह ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन!

‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून पिटकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने पुढे येण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन

इंदापूर –विजय शिंदे

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२६-२७’ राबविण्यात येत आहे. या अभियानात इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर ग्रामपंचायत सक्रिय सहभाग घेणार असून, गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी गावातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी नंदराज चंदनशिवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश गावातील मूलभूत सुविधा सक्षम करणे, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावाचा शाश्वत विकास साधणे हा आहे. अभियानासाठी शासनाने १०० गुणांची प्रश्नावली निश्चित केली असून, त्यानुसार ग्रामपंचायतीच्या विविध कामांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत गावात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी बचत, जलसंधारण, नाले व गावतलाव स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गाव, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती अशा विविध उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी आणि सार्वजनिक सुविधांचा विकास करण्याचे नियोजन आहे.

महिला बचत गटांचे सक्षमीकरण, महिलांना रोजगाराच्या संधी, लखपती दीदी योजना, युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू कुटुंबांना घरकुल योजनांचा लाभ मिळवून देणे अशा उपक्रमांचाही अभियानात समावेश आहे.

माजी पदाधिकारी व संस्थांच्या प्रतिनिधींनीही सहभागी व्हावे

गावाच्या विकासासाठी केवळ विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची जबाबदारी पुरेशी नसून, गावातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे पिटकेश्वर गावातील माजी सरपंच, माजी उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळे, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.

गावाच्या विकासासाठी यापूर्वी योगदान दिलेल्या माजी पदाधिकाऱ्यांचे अनुभव, मार्गदर्शन आणि सहकार्य अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ग्रामस्थांचा लोकसहभाग ठरणार महत्त्वाचा

प्रत्येक ग्रामस्थाने घर व परिसर स्वच्छ ठेवणे, श्रमदान मोहिमेत सहभागी होणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, वृक्षलागवड करून झाडांचे संगोपन करणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

शासनाच्या या अभियानाचा कालावधी ३१ मार्च २०२७ पर्यंत असून, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींचे स्वतंत्र गट करून गुणांकनाच्या आधारे पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पिटकेश्वर ग्रामपंचायतीला गावाच्या विकासकामांची गुणवत्ता आणि लोकसहभाग दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘माझे गाव, माझी जबाबदारी’ हा संकल्प घेऊन माजी सरपंच, उपसरपंच, विद्यमान व माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने या अभियानात सहभागी व्हावे. सर्वांच्या सहकार्याने स्वच्छ, सुंदर, हरित, जलसमृद्ध आणि आदर्श पिटकेश्वर घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पिटकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button