Uncategorized

उजनी परिसरात एआय डेटा सेंटरसह कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची ठाम भूमिका; ३१ ऑक्टोबरला भीमा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन

इंदापूर | विजय शिंदे

उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट यांसह अन्य प्रकल्पांना तीव्र विरोध करण्यासाठी आता सर्वपक्षीय आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमा नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात शेतकरी, मच्छीमार, सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी खासदार मोहिते-पाटील यांनी सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) माढा तालुक्यातील रांजणी येथे आढावा बैठक घेतली.

उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनवाहिनी असून, या धरणाच्या पाण्यावर लाखो हेक्टर क्षेत्रातील शेती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि मत्स्यव्यवसाय अवलंबून आहे. जलाशयावर आधारित अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अशा परिस्थितीत प्रस्तावित औद्योगिक व ऊर्जा प्रकल्पांमुळे पाण्याचा वापर, पर्यावरणीय समतोल, मानवी आरोग्य, शेती आणि मच्छीमारांच्या रोजगारावर काय परिणाम होणार, याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

प्रस्तावित प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत आणि पर्यावरणीय परिणामांबाबत तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास करून त्याची माहिती जनतेसमोर मांडावी. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. हे विनाशकारी प्रकल्प रद्द करून जलसंपदा विभागाने संपादित केलेल्या शिल्लक जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात. उजनी धरण परिसरात हे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा ठाम इशारा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला.

उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांच्या भवितव्याचा हा प्रश्न असल्याने पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. ३१ ऑक्टोबरच्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रश्नावर आगामी काळातही लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस शिवाजीराव पाटील चांदजकर, प्रा. सुहास पाटील, शिवाजीराव बंडगर, गोविंद पवार, भारत माने, दशरथ कांबळे, प्रा. कृष्णाजी ताटे, अनिता खरात, विजय नगरे, श्रीकांत नगरे, अविनाश सरडे, निलेश देवकर, नंदकुमार नगरे, सतीश केचे, विलास जाधव, सौरभ आरकीले, संदीप माने, अक्षय यादव, शंकर उबाळे, सुरेश पाटील, बाळासाहेब ढेकणे, आकाश पाटील, गणेश वाघ आदींसह इंदापूर, माढा व करमाळा तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट : सर्वपक्षीय नेते रास्ता रोको आंदोलनात उतरणार!

३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळत असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायणआबा पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button