Uncategorized

पुणे जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कालवा सल्लागार समितीची बैठक; ऑगस्ट २०२७ पर्यंत १० टक्के पाणीकपातीचा निर्णय

पुणे शहरासाठी १३ टीएमसी पाण्याचे नियोजन; पिण्याचे पाणी, शेती आणि पशुपालनाला प्राधान्य

पुणे | विजय शिंदे

पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. पुण्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा, संभाव्य पाणीटंचाई आणि आगामी काळातील पाण्याची गरज यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

ऑगस्ट २०२७ पर्यंत १० टक्के पाणीकपात

सध्याची पावसाची परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन ऑगस्ट २०२७ पर्यंत १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर शेती आणि पशुपालनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे यावरही भर देण्यात आला.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता, संभाव्य टंचाई आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन

पावसाची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित

या बैठकीला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार राहुल कुल यांच्यासह पुणे जिल्हा परिषद व पुणे महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठ्याचे नियोजन, पाणीपुरवठ्याला प्राधान्य आणि काटकसरीने वापर या बाबींना या बैठकीत महत्त्व देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button