पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित; प्रवीण माने यांचा विश्वास.

विजय शिंदे
इंदापूर तालुक्यात प्रमुख गावांना भेटी देत प्रचाराला वेग; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन
इंदापूर | प्रतिनिधी
कार्यकर्त्यांची एकजूट, परस्पर समन्वय आणि नियोजनबद्ध प्रयत्नांच्या बळावर पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी सभापती व इंदापूर भाजपचे नेते प्रवीण माने यांनी व्यक्त केला.या वेळी त्यांच्यासोबत धुळे शहर चे आमदार तथा इंदापूर तालुक्याचे निवडणूक प्रभारी अनुप अग्रवाल उपस्थित होते.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण माने सध्या इंदापूर तालुक्यातील प्रमुख गावांचा दौरा करत असून, पदवीधर व शिक्षक मतदारांशी संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले होते.
या बैठकीत निवडणुकीची पूर्वतयारी, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे नियोजन तसेच संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे वाटप यावर चर्चा करण्यात आली. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्त्यांनी समन्वय राखून काम करावे आणि मतदारांशी थेट संवाद साधावा, यावर भर देण्यात आला.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रवीण माने यांनी केले.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये बैठका घेऊन प्रवीण माने पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी संवाद साधत आहेत. भाजप व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला गती देण्यासाठी गावपातळीवर संघटनात्मक बांधणी आणि मतदार संपर्कावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आकाश कांबळे,भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



