पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीची रणनीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रचाराचा आढावा

विजय शिंदे
पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (बुधवारी) पुणे जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेऊन निवडणुकीतील विजयासाठी नियोजनावर चर्चा करण्यात आली.
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधावा, तसेच त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना केले.
या निवडणुकीत भाजप-महायुतीचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मतदारांशी थेट संपर्क साधून प्रचाराला अधिक गती देण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश दादा पांडे, यांच्यासह भाजप-महायुतीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.



