उजनी धरणावरील खाजगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द

विजय शिंदे
मच्छीमार बांधवांच्या मागणीला यश; शासनाकडून महत्त्वाचा निर्णय
मंत्रालय, मुंबई | ५ ऑक्टोबर २०२६ : उजनी धरण परिसरातील पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन उजनी धरणावरील खाजगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.
उजनी धरण परिसरातील पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर खाजगी ठेक्यामुळे परिणाम होण्याची शक्यता होती. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन मागील काही दिवसांपासून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर आज ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे भरणे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यासह उजनी धरण परिसरातील मच्छीमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.



