Uncategorized

आधुनिक तंत्रज्ञान आणि ए.आय.च्या युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी करावे.

— राजेंद्रदादा पवार

विजय शिंदे

इंदापूर : आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय.चा वापर प्रत्येक क्षेत्रात वेगाने वाढत असून, काळाची पावले ओळखून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षण न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम, स्वावलंबी आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करावे, असे प्रतिपादन बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त इंदापूर येथील सौ. कस्तराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित जयंती सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पवार म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान आणि ए.आय.चा वापर आज प्रत्येक क्षेत्रात सुरू झाला आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबत आधुनिक कौशल्यांचा समावेश करणे काळाची गरज आहे. भावी पिढी सक्षम घडविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या बदलत्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण क्षेत्राने काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी विद्यालयातील अपुऱ्या भौतिक सुविधांकडे लक्ष वेधत विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच माजी विद्यार्थी संघटना व स्कूल कमिटी सदस्य म्हणून विद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने यांनी विजयकुमार शिंदे यांच्या मागणीनुसार विद्यालयाच्या रंगकामासाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा सदैव अभिमान वाटतो, असे सांगत विद्यार्थ्यांनी कितीही कठीण परिस्थिती आली तरी प्रयत्न करत पुढे जात राहावे; मार्ग आपोआप सापडतो आणि प्रयत्नांमधून यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांनी दिला.

ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.

प्रवीण माने यांनी कर्मवीर जयंतीनिमित्त शुभेच्छा देत विद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. इंदापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून विद्यालयातील भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास जाधव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांसमोर आढावा मांडला. कर्मवीर अण्णांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांचा जागर करून रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या कार्याचे पाईक होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा समिती सदस्य कैलास कदम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक समितीचे सदस्य ॲड. इनायतअली काझी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. राहुल मखरे, ॲड. गिरीश शहा, अनिल ढावरे, शिवाजीराव मखरे, पोपट जाधव, छाया जाधव, सयाजी काटकर, सुनील जाधव, बाळकृष्ण क्षीरसागर, महादेव चव्हाण, हमीद आत्तार, जयकुमार शिंदे, तय्यब शेख, अक्षय कोकाटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील मोहिते, अश्विनी अभंग व स्वाती गाढवे यांनी केले, तर आभार होनाजी गवळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button