इंदापूर तालुक्यात दुष्काळाचे सावट; पावसाअभावी खरीप पिके धोक्यात, शेतकऱ्यांचा धीर खचू लागला.

विजय शिंदे
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण घटले असून, पावसाने दडी मारल्याने इंदापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडल्या असून, मका, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
इंदापूर हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र खरीप हंगामातही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भाजीपाला तसेच चारा पिकांची लागवड केली जाते. या पिकांसाठी जून आणि ऑगस्ट महिन्यातील पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात तसेच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असते. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली असून, अनेक भागांत पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाअभावी जमिनीत ओलावा राहिलेला नाही. विहिरी, विंधन विहिरी आणि जलस्रोतांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप पिकांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि आता पावसाची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त भागात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पावसाने अशीच दडी मारल्यास इंदापूर तालुक्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



