Uncategorized

बाल कीर्तनकार संचिता ताई यादव यांच्या कीर्तनाने रंगला हरिनामाचा गजर.!

विजय शिंदे

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेडशिंगे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी बाल कीर्तनकार संचिता ताई यादव (बेडशिंगे) यांच्या प्रभावी कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारच्या दिवशी श्रीक्षेत्र महादेव मंदिर परिसरात झालेल्या या कीर्तन सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.संचिता ताई यादव यांनी संत तुकाराम महाराजांच्या “आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया” या अभंगाचे सांप्रदायिक पद्धतीने भावपूर्ण निरूपण केले.

अभंगातील संस्कार, सदाचार, जीवनमूल्ये आणि आई-वडिलांचे महत्त्व त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविकांसमोर मांडले.लहान वय असूनही अभंग सादरीकरण, निरूपणाची शैली, आवाजातील गोडवा आणि विषय मांडण्याची प्रभावी हातोटी यामुळे संचिता ताईंच्या कीर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.कीर्तनातील प्रत्येक अभंग, दृष्टांत आणि विचारांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान वयात अध्यात्माची आवड जोपासत कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या संचिता ताई यादव यांचे ज्येष्ठ नागरिक, महिला, वारकरी आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.यावेळी भावना व्यक्त करताना संचिता ताई यादव म्हणाल्या, “श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारच्या दिवशी महादेव मंदिरासमोर कीर्तनसेवेचा योग मिळणे हे माझे भाग्य आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सेवा करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते.”दरम्यान, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ बेडशिंगे यांच्या वतीने आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात विविध कीर्तनकारांची कीर्तनसेवा, भजन, हरिजागर आणि गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बेडशिंगे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.संतवाणीचा वारसा जपत लहान वयात समाजप्रबोधन करणाऱ्या संचिता ताई यादव यांच्या कीर्तनसेवेने सप्ताहाचा तिसरा दिवस अविस्मरणीय ठरला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button