आगामी रब्बी हंगाम व संपूर्ण वर्ष सुजलाम-सुफलाम जावे; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे श्री नंदिकेश्वर चरणी साकडे.

विजय शिंदे
इंदापूर : प्रतिनिधीइंदापूर तालुक्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आगामी रब्बी हंगाम व संपूर्ण वर्ष सुजलाम-सुफलाम जावे, यासाठी आगामी काळात धो-धो पाऊस पडू दे, असे साकडे श्री नंदिकेश्वर चरणी घातल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील निरवांगी नजीक दगडवाडी येथील नीरा नदीच्या काठी वसलेल्या प्राचीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी सोमवारी (दि.२४) विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.मंदिर परिसरात आगमन होताच ग्रामस्थांनी वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे पौरोहित्य विठ्ठल गुरव यांनी केले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, “इंदापूर तालुक्यातील नंदिकेश्वर देवस्थानासह इतर देवस्थानांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाल्याने मंदिर परिसरांचा विकास झाला आहे. नंदिकेश्वर मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले असून आता प्राचीन दगडी बांधकामाचे फिनिशिंग व जीर्णोद्धाराचे उर्वरित काम पूर्ण केले जाईल.”ते पुढे म्हणाले, “पुरेशा पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. सध्या नीरा व भीमा नद्या वाहत असल्या तरी पुरेसा पाऊस झाला नाही तर नदीपात्रातील पाणी जास्त काळ टिकणार नाही. नंदिकेश्वर देवस्थान हे इंदापूर तालुक्याचे वैभव असून जागृत देवस्थान आहे. त्यामुळे नंदिकेश्वराच्या आशीर्वादाने आगामी काळात समाधानकारक पाऊस पडेल.”इंदापूर तालुका शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून येथील युवक शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची शिखरे गाठत असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.यावेळी दत्तात्रय पोळ, मनोज निंबाळकर, वीरसिंह रणसिंग यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू रोकडे यांनी केले.याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.चौकट : नीरा-भीमा कारखान्याकडून बंधारे अडविण्याची जबाबदारीनीरा-भीमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नरसिंहपूरपर्यंतचे १३ बंधारे तसेच भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणु व शेवरे येथील बंधारे अडविण्याची जबाबदारी कारखाना घेणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये मे महिन्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध राहून शेतकऱ्यांना फायदा होईल. हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीचा पहिला प्रयोग असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.



