Uncategorized

इंदापुरात भरणे मामांचे ‘परफेक्ट प्लॅनिंग’; महायुतीसाठी राष्ट्रवादी-भाजपची यंत्रणा मैदानात!

इंदापूर | प्रतिनिधी

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत शुक्रवार, दि. २३ रोजी चुरशीने मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे, नेत्यांची प्रतिष्ठा आणि संघटनात्मक ताकदीची कसोटी पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षाचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी महायुतीने इंदापूरमध्ये विशेष नियोजन केल्याचे चित्र दिसून आले. या संपूर्ण प्रक्रियेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, निरीक्षक आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्ष घालत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून बूथनिहाय यंत्रणा सक्रिय केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भरणे मामांचे बूथनिहाय नियोजन चर्चेत!

इंदापूर तालुक्यातील पाचही मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची वर्दळ पाहायला मिळाली. पदवीधर मतदारांच्या तुलनेत शिक्षक मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक असल्याचे चित्र होते. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षित प्रतिसाद मिळावा, यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बूथनिहाय जबाबदाऱ्या दिल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, अतुल झगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ एजंट नेमून संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिवसभर केंद्रावर थांबून समन्वय राखावा, अशा सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे.

निवडणुकीपूर्वी भरणे यांनी तालुक्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधल्याचेही सांगितले जाते. स्थानिक पातळीवरील संपर्क, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि मतदानाच्या दिवशीची यंत्रणा यांचा महायुतीच्या कामगिरीवर काय परिणाम झाला, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी-भाजपमध्ये समन्वय; कार्यकर्ते सक्रिय

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांसाठी एकत्रितपणे काम करताना दिसल्याची चर्चा आहे. कृषिमंत्री भरणे यांनी स्थानिक राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीचा उपयोग करत भाजपच्या उमेदवारांसाठी यंत्रणा उभी केल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या फोनसंदर्भातील व्हायरल क्लिप आणि आमदार रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अधिक जोमाने महायुतीच्या उमेदवारांच्या कामाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या घडामोडींचा मतदानावर नेमका किती परिणाम झाला, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

भाजपच्या गारटकर, माने यांच्याकडून मतदारांना थेट संपर्क.

भाजपचे निरीक्षक आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे नेते प्रदीप गारटकर आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनीही या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. भाजपचे चारही मंडल प्रमुख, जिल्हास्तरीय पदाधिकारी, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि बूथ प्रमुख यांच्याशी संपर्क साधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारांची माहिती, त्यांच्याशी संपर्क, मतदानाच्या दिवशीचा समन्वय आणि बूथनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप या बाबींवर भर दिल्याची चर्चा आहे. स्थानिक नेतृत्व आणि पक्षसंघटनेतील समन्वयामुळे महायुतीच्या प्रचारयंत्रणेला बळ मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचेही लक्ष?

या निवडणुकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असल्याची चर्चा इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मतदानापूर्वी इंदापूर तालुक्यातील महायुती मधील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट फोन करून परिस्थितीची माहिती घेतल्याचेही बोलले जात आहे. या चर्चेमुळे पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महायुतीसाठी किती महत्त्वाची होती, याची कल्पना येते.

इंदापुरात शांततेत मतदान.

पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातील पाच मतदान केंद्रांवरील १४ बूथवर शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील एकूण ८ हजार ६९५ मतदारांपैकी ५ हजार ८४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात ६७.२५ टक्के मतदान झाले. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.तालुक्यातील बावडा, भिगवण, इंदापूर शहर, निमगाव केतकी आणि सणसर या पाच केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button