Uncategorized

पळसदेवच्या रवींद्र काळे यांची कोकण विभाग ठाणे येथे प्रशासकीय अधिकारी वर्ग-१ पदी पदोन्नती; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त सत्कार

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पुनर्वसित पाणलोट क्षेत्रातील पळसदेव गावचे सुपुत्र रवींद्र काळे यांची कोकण विभाग ठाणे येथे प्रशासकीय अधिकारी वर्ग-१ पदावर पदोन्नती झाल्याबद्दल पळसदेव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय शेलार, मधुकर रंधवे, देविदास बांडे, राजेंद्र काळे, वामन गांधले, मल्हारी काळे, संपत येडे, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार, अण्णा नायकवडी, मेघराज कुचेकर, सनी कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भूषण काळे म्हणाले, “पळसदेव हे पळसनाथांचे पवित्र गाव म्हणून ओळखले जाते. उजनी धरणासाठी येथील ग्रामस्थांनी मोठा त्याग केला आहे. या पवित्र भूमीचा नावलौकिक वाढविण्याचे काम रवींद्र काळे यांनी आपल्या कर्तृत्वातून केले असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

सत्काराला उत्तर देताना रवींद्र काळे म्हणाले, “मी मूळचा शेतकरी कुटुंबातील असून उजनीचा भूमिपुत्र आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, संघर्ष आणि व्यथा जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे ‘शेतकरी सुखी तरच जग सुखी’ या भावनेने सेवेत काम केले. त्या सेवेचे फळ म्हणून प्रशासकीय अधिकारी वर्ग-१ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पळसदेव ग्रामस्थांनी केलेला हा सत्कार माझ्यासाठी घरच्या सत्कारासारखा असून मी सर्वांच्या ऋणात राहीन.”

रवींद्र काळे यांनी आतापर्यंत कृषी आयुक्तालय पुणे तसेच विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे येथे सहायक प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सन १९९७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सहायक अधीक्षक म्हणून कृषी विभागातील सेवेला सुरुवात केली. तब्बल २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांची पदोन्नतीने प्रशासकीय अधिकारी वर्ग-१ म्हणून ठाणे येथे नियुक्ती झाली आहे.

रवींद्र काळे यांच्या या यशाबद्दल पळसदेवसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button