Uncategorized

इंदापुरात तहसीलदार बनसोडेंवरून राजकीय रणधुमाळी! एका बाजूला हटवण्याची मागणी, तर दुसऱ्या बाजूला समर्थनासाठी पत्रकार परिषद;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन इंदापूरच्या महसूल प्रशासनाचा कारभार तपासणार का?

विजय शिंदे

इंदापूर : इंदापूरच्या राजकारणात सध्या सर्वपक्षीय विरुद्ध सर्वपक्षीय असा सामना रंगू लागला आहे. निमित्त ठरले आहे ते इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे! तहसीलदार बनसोडे यांच्या कारभाराविरोधात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी इंदापुरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मागणीला प्रत्युत्तर देत दुसऱ्या बाजूने बनसोडे यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद आयोजित केल्याने इंदापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आज भाजपचे प्रदीप गारटकर, प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महारुद्र पाटील, काँग्रेसचे निवास शेळके, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, शिवसेनेचे नितीन शिंदे, महादेव सोमवंशी, तानाजी धोत्रे, भीमा कोरेगाव संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष चितारे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांना इंदापूरमधून हटवण्याची मागणी केली.

या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठीच हा लढा उभारल्याचे सांगितले. त्यानुसार २५ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

विशेष म्हणजे, आज पहिल्या गटाची पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या सर्वपक्षीय गटाने उद्या तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य कोणते पक्ष आणि संघटना सहभागी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच तहसीलदार बनसोडे यांच्या समर्थनार्थ नेमकी कोणती बाजू मांडली जाणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

मोर्चात सामान्य जनता की अवैध धंदेवाल्यांचे हितसंबंध?

या संपूर्ण घडामोडीत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदारांच्या विरोधातील आणि समर्थनातील या दोन्ही गटांच्या भूमिकेमागे नेमका कोणाचा आवाज आहे? सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे राजकीय शक्तिप्रदर्शन होत आहे की, महसूल विभागाच्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या काही हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे? वाळू उपसा, मुरूम उत्खनन आणि इतर अवैध धंद्यांशी संबंधित घटकांची भूमिका काय असणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. अर्थात, कोणत्याही गटावर सरसकट आरोप न करता या बाबींची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.

कृषिमंत्री भरणे यांच्या स्वच्छ कारभाराची चर्चा;

आता इंदापूरच्या महसूल विभागाकडे लक्ष! तहसीलदारांबाबत काय भूमिका घेणार?

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागातील कामकाजात स्वच्छता, पारदर्शकता आणि शेतकरीहिताला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच इंदापूर तालुक्यातील महसूल विभागाच्या कारभाराबाबत वारंवार वेगवेगळ्या चर्चा आणि तक्रारी समोर येत आहेत.तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभाराविरोधात आता विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकवटले असून, २५ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे या प्रकरणाची दखल घेणार का? महसूल विभागाच्या कामकाजाबाबत ते कोणती भूमिका मांडणार आणि तहसीलदारांच्या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे आता इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.कृषी विभागातील कारभाराचा आदर्श इंदापूरच्या महसूल विभागातही दिसणार का? हा प्रश्न आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यात महसूल खात्याची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न, मग इंदापुरातच प्रश्न का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून राज्याच्या महसूल विभागात अनेक महत्त्वपूर्ण बदल आणि निर्णय घेतले जात आहेत. महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, इंदापूरमध्ये महसूल विभागाच्या कामकाजाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत असतील, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या धुरळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे मूळ प्रश्न मात्र बाजूला पडता कामा नयेत. सातबारा, फेरफार, जमिनीचे वाद, मोजणी, वारस नोंदी, शासकीय दाखले आणि महसूल कार्यालयातील कामांसाठी तालुक्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हेलपाटे मारणाऱ्या सामान्य नागरिकांना खरोखर न्याय मिळतोय का? त्यांचे प्रश्न वेळेत सुटत आहेत का? याचे उत्तर मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.

फडणवीस-बावनकुळे इंदापूरच्या महसूल कारभाराकडे लक्ष देणार का?

तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात होणाऱ्या पत्रकार परिषदांमुळे इंदापूरचे राजकारण तापणार हे निश्चित आहे. मात्र, या संघर्षातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळणार की केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन होणार, हा खरा प्रश्न आहे.

२५ नोव्हेंबरच्या मोर्चात नेमके कोण सहभागी होतात, कोणत्या गटामागे कोणते हितसंबंध आहेत आणि उद्याच्या पत्रकार परिषदेत समर्थनार्थ कोणते मुद्दे मांडले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेवटी प्रश्न एकच… इंदापुरात तहसीलदार कोण असावा, यापेक्षा सामान्य जनतेला न्याय कोण देणार? राजकारणाच्या या संघर्षात सर्वसामान्य नागरिकांचा वाली कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन इंदापूरच्या महसूल प्रशासनाचा कारभार तपासणार का?

कारण इंदापूरला राजकीय शक्तिप्रदर्शन नको, तर पारदर्शक आणि लोकाभिमुख महसूल प्रशासन हवे आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button