गणरायाच्या आगमनाची लगबग; इंदापूर बाजारपेठ गणेशोत्सवासाठी सज्ज.

विजय शिंदे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.
गणेशमूर्ती विक्रीसाठी शहरातील विविध ठिकाणी आकर्षक मंडप उभारण्यात आले असून, विविध आकार, रंग आणि कलाकुसरीच्या गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईनमधील मूर्तींना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू यांची दुकानेही सजली आहेत. त्यामुळे इंदापूर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघी काही दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती विक्रेते, व्यापारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.



