आज इंदापूरमध्ये दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

विजय शिंदे
इंदापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज ५ वाजता (गुरुवारी) इंदापूर येथील श्री इंद्रेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिक्षक, समर्थक व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
दत्तात्रय सावंत हे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार असून, जुलै २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. विधानपरिषदेत त्यांनी तालिका सभापती म्हणूनही काम पाहिले आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव म्हणूनही सावंत कार्यरत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने, पायी दिंडी आणि शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, भाजप तसेच महाविकास आघाडी या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे शिक्षक मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, २०२६ च्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी जारी झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी, तर मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
इंदापूर येथील प्रचार शुभारंभातून सावंत यांच्या निवडणूक तयारीला अधिकृतपणे सुरुवात होत असून, पुढील काळात शिक्षकांच्या प्रश्नांवर ते कोणती भूमिका मांडतात, याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.



