पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे खाते सोसायटी वर्गातून उघडणार?

विजय शिंदे
संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली; अशोक पवारांची भूमिका निर्णायक ठरणार.
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून, भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. भोरचे माजी आमदार व बँकेचे विद्यमान संचालक संग्राम थोपटे तसेच पुरंदर-सासवडचे माजी आमदार व बँकेचे विद्यमान संचालक संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बँकेच्या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाठीमागील पंचवार्षिक निवडणुकीत बँकेच्या २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या उर्वरित सात जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली होती.
जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष (उत्तर) व विद्यमान संचालक प्रदीप कंद यांनी क वर्ग मतदारसंघातून विजय मिळवला होता. महाविकास आघाडी / राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांनी भाजपचे बँकेत खाते खोलले होते.
आता मात्र पुणे जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने सहकारी संस्थांच्या सोसायटी वर्गातील निवडणुकीतही भाजपला बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सोसायटी वर्गातून खाते उघडणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरूर तालुका ‘अ’ वर्ग (विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था / सोसायटी) मतदारसंघातून माजी आमदार ॲड. अशोक रावसाहेब पवार विजयी झाले होते. जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलतर्फे निवडणूक लढवून विजय मिळवला होता. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात असून, आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक व राजकीय ताकद वाढत असताना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्ष मोठ्या ताकदीनिशी उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बँकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजप आव्हान देणार का, तसेच सोसायटी वर्गातील समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



