नीरा नदीच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर; सराटीत रास्ता रोको आंदोलन.. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह नेते रस्त्यावर.

विजय शिंदे
सराटी (ता. इंदापूर) : नीरा नदीपात्र कोरडे पडल्याने इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली असून, उभी पिके जळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नीरा नदीत तातडीने पाणी सोडून नदीवरील बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सराटी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नीरा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील शेतकरी व ग्रामस्थांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देऊन नीरा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
पाण्याअभावी नदीवरील बंधारे कोरडे पडले असून, परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेही कठीण बनले आहे. दुसरीकडे शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज जगदाळे यांच्यासह इंदापूर व माळशिरस तालुक्यांतील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
विजयसिंह मोहिते-पाटील उन्हात रस्त्यावर!
या आंदोलनातील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे स्वतः कडक उन्हात रस्त्यावर बसून आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या या सहभागाची आंदोलनस्थळी मोठी चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेत्यांनाही पाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने नीरा नदीकाठच्या गावांतील पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित होत असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
आता तरी शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन नीरा नदीत तातडीने पाणी सोडावे, नदीवरील बंधारे भरून द्यावेत आणि नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या वतीने अधिकारी पोहोचले असून ते आंदोलनकर्त्याशी संवाद साधत आहेत.



