मच्छीमार बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून जाधव कुटुंबाचा माणुसकीचा उपक्रम!
शहा महादेव नगर येथील जाधव कुटुंबाकडून उजनी परिसरातील मच्छीमारांना दिवाळी किटचे वाटप; सलग २६ व्या वर्षी सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम
इंदापूर | प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा सण! प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद फुलावा, गरजू कुटुंबांचीही दिवाळी गोड व्हावी, या उदात्त भावनेतून शहा महादेव नगर येथील जाधव कुटुंबीयांनी उजनी धरण परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी राबविलेला सामाजिक उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा २६ वे वर्ष असून, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची अनोखी परंपरा जाधव कुटुंबीयांनी जपली आहे.
उजनी धरणात मच्छीमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमार बांधवांना दरवर्षी दिवाळीनिमित्त जीवनावश्यक साहित्याचे किट भेट देण्यात येते. या किटमध्ये हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल, साबण, सुगंधित उटणे यांसह दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्याचा समावेश असतो. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद साजरा करताना अडचणी येणाऱ्या मच्छीमार कुटुंबांना मोठा आधार मिळतो.
यंदा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जाधव कुटुंबीयांनी यंदाच्या दिवाळी किटमधील प्रत्येक साहित्यामध्ये पाच किलोने वाढ केली आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक साहित्य देत प्रत्येक वस्तू दहा किलोच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेत मच्छीमार बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी बोलताना तात्यासाहेब जाधव व रमेश जाधव म्हणाले की, “गरिबांची दिवाळीही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. उजनी परिसरातील मच्छीमार बांधवांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या कुटुंबातही आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, या भावनेतून आम्ही गेल्या २५ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने साहित्याच्या प्रमाणात वाढ करून प्रत्येक वस्तू दहा किलोच्या स्वरूपात देण्यात आली आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळतो, यातच आम्हाला खरा आनंद मिळतो.”
या उपक्रमात तात्यासाहेब जाधव, रमेश जाधव, हर्षवर्धन जाधव, डॉ. राहुल जाधव यांच्यासह जाधव कुटुंबातील इतर सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी गोविंद महाराज व संत बाळूमामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सण केवळ स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेण्याची भावना जाधव कुटुंबीयांनी गेली २६ वर्षे जपली आहे. दिवाळीच्या प्रकाशात माणुसकीचा दिवा तेवत ठेवणारा हा उपक्रम उजनी परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.



