Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत भाजपची मुसंडी; काँग्रेसला धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दमदार कामगिरी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर मतदारसंघांत भाजपची आगेकूच; पाच जागांच्या लढतीत राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण

इंदापूर | विजय शिंदे

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांत दमदार कामगिरी केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांत आघाडी घेतल्याने राजकीय लढत अधिक रंगतदार झाली. काँग्रेससाठीही या निवडणुकीतील निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

२०२० च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लढतीत पक्षीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांमधील स्पर्धा या निवडणुकीत ठळकपणे समोर आली.

फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपची आगेकूच

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी मतमोजणीच्या विविध टप्प्यांत आघाडी घेतली, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्याशी चुरशीची लढत दिली. या दोन्ही मतदारसंघांतील भाजपच्या कामगिरीमुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची चर्चा सुरू झाली.

भाजपने या निवडणुकीत दोन जागांवर आघाडी घेतल्याने पक्षासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन जागांची वाढ झाली असून शिक्षक व पदवीधर मतदारसंघात भाजपला यश मिळाल्याने राज्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा भाजपला जास्त फटका बसल्याचे दिसून आले नाही.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पदवीधर मतदारसंघांत आघाडी

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव-देशमुख यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्याविरुद्ध आघाडी घेतली. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याशी सामना केला.

या दोन्ही मतदारसंघांतील लढतींमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय ताकद आणि पदवीधर मतदारांमधील पाठिंबा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते.

काँग्रेससमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान

पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव स्वीकारावा लागला ,तर नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारी या विद्यमान आमदारांनाही पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे सुधाकर कोहळे यांच्याशी वंजारी यांची लढत झाली. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार करळे यांचा थेट परिणाम वंजारी यांच्यावर झाला.

या निवडणुकीतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आपल्या संघटनात्मक तयारीचा, मतदारांशी असलेल्या संपर्काचा आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाचा आढावा घ्यावा लागणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांना स्वतंत्रपणे आपली राजकीय ताकद सिद्ध करण्याची संधी मिळाली . छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार सतीश चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला, दोन्ही राष्ट्रवादी मध्ये झालेल्या या लढतीत शरदचंद्र पवार पक्षाचे पाटील विजयी झाले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये आपला जनाधार टिकवण्यासाठी आणि संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, असे या लढतींच्या पार्श्वभूमीवर म्हणता येईल.

अमरावतीत शिंदेसेनेचीही चर्चा

अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर असल्याचे वृत्त मतमोजणीदरम्यान समोर आले. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबरोबरच शिवसेनेच्या कामगिरीकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.

आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना दिशा

विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणूक ही केवळ काही आमदार निवडण्यापुरती मर्यादित नसून राज्यातील राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीची आणि मतदारांशी असलेल्या संपर्काची कसोटी मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दाखवलेली कामगिरी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पदवीधर मतदारसंघांत घेतलेली आघाडी आणि काँग्रेससमोरील आव्हाने यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button