पुण्यात भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक; आगामी रणनीतीवर होणार मंथन.

विजय शिंदे
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी पुणे शहरात होणार आहे. या बैठकीसाठी पुण्याची निवड का करण्यात आली, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच मंडल अध्यक्षांपर्यंतचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा आहे. तसेच तरुण वर्गातील नाराजी, ‘जेन-झी’ पिढीचे बदलते राजकीय कल आणि विरोधकांकडून भाजपवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
पुणे हे राज्यातील महत्त्वाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक केंद्र असल्याने भाजपने संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुण्याची निवड केल्याचे बोलले जात आहे.
बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे, आगामी निवडणुकांची तयारी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे तसेच विरोधकांच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात भाजपची ही प्रदेश कार्यकारिणी बैठक आगामी काळातील पक्षाच्या राजकीय वाटचालीसाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.



