जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.

विजय शिंदे
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली असून, यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
ग्रामविकास विभागाने नुकतीच याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शासनाच्या नवीन नियमानुसार, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के किंवा किमान 5 सदस्य नामनिर्देशित केले जातील. पंचायत समितीमधील एकूण सदस्यसंख्येच्या 20 टक्के किंवा किमान 1 सदस्य नियुक्तीला परवानगी देण्यात आली आहे.
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना मिळणार थेट संधी
केवळ राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच नव्हे, तर ज्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रशासनाविषयी विशेष ज्ञान किंवा कार्यानुभव आहे, अशा विविध व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांना यामध्ये थेट संधी मिळणार आहे.
नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी शासनाने काय अटी निश्चित केल्या आहेत?
स्थानिक रहिवाशी: उमेदवार संबंधित जिल्हा परिषद क्षेत्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
वैद्यकीय क्षेत्र: राज्यातील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
शिक्षण क्षेत्र: मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयांमधील सेवानिवृत्त प्राध्यापक, व्याख्याते, प्राचार्य किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले शिक्षणतज्ज्ञ.
सामाजिक व कृषी क्षेत्र: कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, कला, साहित्य किंवा समाजकार्य या क्षेत्रांत विशेष ज्ञान आणि किमान 5 वर्षांचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती.
अभियांत्रिकी क्षेत्र: मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी (पदवी आणि संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव
विधी/कायदा क्षेत्र: किमान 5 वर्षे वकील म्हणून कार्यरत असलेली किंवा विधी पदवी धारण करून विधी क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती
प्रशासकीय अनुभव: केंद्र अथवा राज्य शासनाच्या सेवेत किमान 20 वर्षांची सेवा पूर्ण केलेले सेवानिवृत्त अधिकारी
.एनजीओ/अशासकीय संस्था: महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणीकृत अशासकीय संस्थेचे (NGO) पदाधिकारी म्हणून सामाजिक कल्याणविषयक उपक्रमांमध्ये किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले कार्यकर्ते.
पक्षीय संख्याबळानुसार होणार शिफारस
संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेतील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्ष, गट किंवा आघाड्यांच्या नेत्यांशी सल्लामसलत करून आणि संख्याबळाचा (विचार करून योग्य व्यक्तींच्या नावांची शिफारस करतील. पारदर्शक पद्धतीने आणि तज्ज्ञांचा अनुभव स्थानिक विकासासाठी वापरून घेण्याच्या उद्देशाने ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती मिळण्यासोबतच विविध क्षेत्रांतील अभ्यासू व अनुभवी व्यक्तींचा थेट सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढणार आहे.



