रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; अंगावर जखमा, बारामतीत खळबळ

विजय शिंदे
बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
मृत मुलगी ही आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतरे यांची मुलगी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित कुटुंबियांवर या घटनेमुळे मोठा आघात झाला आहे.मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला, ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
अधिकृत वैद्यकीय अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आमदार रोहित पवार हे थोड्याच वेळात बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई वेगाने करत आहे.



