Uncategorized

भाटनिमगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता;तीन शिक्षकांवर अध्यापनाचा भार.

विजय शिंदे

पदवीधर शिक्षक नियुक्त; मात्र १६ जूनपासून अर्जित रजेवर, तीन शिक्षकांवर अध्यापनाचा भार

भाटनिमगाव : इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने ११३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना सध्या केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याने अध्यापन व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

भाटनिमगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण विभागाच्या माध्यमातून पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र संबंधित शिक्षक अर्जित रजेवर असल्याने शाळेतील अध्यापन व्यवस्थेवर परिणाम झाला असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. नियुक्तीनंतर शाळेचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच ते रजेवर असल्याचा दावा पालकांनी केला आहे.

शाळेतील इयत्ता सहावी व सातवीचा विद्यार्थी पट ३२, तर इयत्ता पहिली ते पाचवीचा पट ८१ आहे. पहिली ते पाचवीच्या ८१ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक कार्यरत असून सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनाही याच शिक्षकांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त अध्यापनाचा भार पडत आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून शाळेत पदवीधर शिक्षकाची कमतरता असल्याचे पालकांनी सांगितले. परिसरातील हायस्कूल जवळपास चार किलोमीटर अंतरावर असल्याने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर जावे लागणे अनेक कुटुंबांसाठी अडचणीचे ठरत असल्याचेही पालकांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. तसेच शाळेतील शिक्षकांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट : आठवडाभरात शिक्षकाची पूर्तता केली जाईल

“पट असलेल्या शाळांसाठी जिल्हा परिषदेकडे शिक्षकांची मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात भाटनिमगाव जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाची पूर्तता केली जाईल.”

पांडुरंग कोळेकर
गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती इंदापूर

चौकट : लवकरच नवीन शिक्षकाची नियुक्ती

“पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार इंदापूर पंचायत समितीचे सभापती, गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच नवीन शिक्षकाची नियुक्ती केली जाईल.”

अर्चना अजित खबाले
सदस्य, पंचायत समिती इंदापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button