Uncategorized

साखरेच्या दरवाढीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू : हर्षवर्धन पाटील

विजय शिंदे

इंदापूर : देशात साखरेच्या दरात झालेली अचानक वाढ ही चिंतेची बाब असून, साखर उद्योगाच्या पुढील पाच-दहा वर्षांच्या नियोजनाची गरज आहे. राष्ट्रीय सहकारी साखर संघ तसेच साखर उद्योगाशी संबंधित सर्व संस्था केंद्र सरकारसोबत असून, दर नियंत्रणासाठी चर्चा सुरू असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

इंदापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, साखरेच्या दरात झालेली अचानक वाढ हे देशातील साखर उद्योगासमोरील मोठे आव्हान आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तसेच साखर उद्योगाचे संतुलन राखण्यासाठी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारात साखरेचे दर ६५ रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, किरकोळ बाजारात साखर ७५ ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गेल्या दीड महिन्यात घाऊक बाजारातील साखरेच्या दरात किलोमागे सुमारे २२ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या ५० दिवसांत किरकोळ बाजारातील दरातही मोठी वाढ झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थसंकल्पावर परिणाम झाला आहे.

साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये साखरेचा साठा मर्यादित ठेवण्यासाठी केवळ १५ दिवसांचा साठा करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच एकात्मिक दर कोट्यांतर्गत १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात ३१ ऑक्टोबरपर्यंत करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, देशातील साखर उद्योग शेतकरी, कारखानदार आणि ग्राहक यांच्या हिताचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारसोबत काम करत असून, भविष्यातील नियोजन करून साखर उद्योगाला स्थिरता देण्याची गरज असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button