Uncategorized

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; ५ ऑक्टोबरपासून पंचनामे.

विजय शिंदे

मुंबई : राज्यातील अनेक भागांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुष्काळ निवारणासाठी विशेष मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे ५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतातील प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेऊन त्यानुसार पुढील मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

कोणाचा समावेश?

दुष्काळ निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील. समितीत गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील आणि मकरंद पाटील यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे निर्देश

राज्यातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मंत्री आणि पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता यासह स्थानिक समस्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

पंचनाम्यानंतर मदतीचा निर्णय

पंचनामे आणि सर्वेक्षणातून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर दुष्काळ जाहीर झाल्याची काही यादी व्हायरल झाली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ती यादी खोटी असल्याचे स्पष्ट केले असून सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button