Uncategorized

तहसीलदार प्रकरणावरून सत्ताधारी पक्षांमध्येच वाद; इंदापूरचे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता – मयूरसिंह पाटील

दोन्ही मोर्चांमध्ये काँग्रेस सहभागी होणार नाही; तहसीलदार जीवन बनसोडे यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

इंदापूर | प्रतिनिधी

इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या प्रकरणावरून सत्तेतील दोन महत्त्वाचे पक्ष आमनेसामने येत असून, या राजकीय संघर्षामुळे इंदापूर तालुक्यातील सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष हा निरपेक्ष भूमिका घेणारा पक्ष असल्याने तहसीलदारांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही मोर्चांमध्ये काँग्रेस सहभागी होणार नाही. मात्र, तहसीलदार जीवन बनसोडे यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता निष्पक्ष आणि पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी केली.

इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मयूरसिंह पाटील यांनी इंदापूर येथील काँग्रेस कार्यालयात पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यात तहसीलदार प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

पाटील म्हणाले की, तहसीलदारांच्या प्रकरणावरून दोन राजकीय पक्षांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत इंदापूर शहरात दहा-वीस हजार रुपयांचा मोबाईल किंवा अन्य किरकोळ कारणावरून काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला जबाबदार कोण राहणार? त्यामुळे राजकीय संघर्ष वाढवण्याऐवजी शांतता आणि सामाजिक सलोखा राखणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तालुक्यातील वाळू उपसा, खडी व्यवसाय, मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया तसेच सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. या सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी मागणी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य बाहेर येणे महत्त्वाचे असून, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका मयूरसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button