उजनीच्या पाण्यावर गदा आणणारा सव्वा लाख कोटींचा प्रकल्प नको!

भाटनिमगावसह उजनीच्या पाणलोट व लाभक्षेत्रातील गावे आक्रमक; प्रस्तावित प्रकल्पांविरोधात उद्या पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
इंदापूर | विजय शिंदे
उजनी धरणाच्या पाण्यावर भविष्यात गदा येण्याची भीती व्यक्त करत उजनी परिसरात प्रस्तावित असलेल्या सव्वा लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित एआय डेटा सेंटरसह चार मोठ्या प्रकल्पांचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत असून, हे नियोजन गोपनीय पद्धतीने केले जात असल्याचा आरोप उजनी बचाव कृती समितीने केला आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि उजनीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रस्तावित एआय डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासू शकते. उजनी धरणातील पाण्याचा वापर अशा औद्योगिक प्रकल्पांसाठी झाल्यास त्याचा परिणाम परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच मच्छीमारांच्या व्यवसायावर होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. उजनीचे पाणी हे केवळ औद्योगिक विकासाचे साधन नसून लाखो नागरिकांच्या जीवनाचा आणि शेतीचा आधार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या पाणीहक्काला बाधा आणणारे प्रकल्प मान्य नसल्याची भूमिका उजनी बचाव कृती समितीने घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर उजनी धरणाचे पाणी आणि परिसराचे हित जपण्यासाठी तसेच प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी दौरे सुरू केले असून, ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव, भाटनिमगाव, भांडगाव, बेडसिंगे आणि अवसरी परिसरात बैठका घेऊन ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रस्तावित प्रकल्पांचे संभाव्य परिणाम समजावून सांगितले जात आहेत. उजनीचे पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाशी जोडलेला विषय असल्याची भावना या बैठकांमधून व्यक्त होत आहे.
या बैठकांना गावोगावचे ग्रामस्थ, शेतकरी, वारकरी, मच्छीमार आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावर विविध गावांतील नागरिक एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाणी आमच्या हक्काचे, उजनी आमच्या जगण्याचे!
उजनीच्या पाण्यावर पहिला प्राधान्यक्रम शेती आणि जनतेच्या मूलभूत गरजांचा असावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. उद्याच्या रास्ता रोको आंदोलनातून या प्रश्नाला व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता असून, उजनीच्या पाण्याबाबत शासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.



