Uncategorized

भौतिक सुखाच्या मागे न धावता नात्यांमधील प्रेम जपण्याचा अनोखा प्रयत्न; सराटीत चार पिढ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात!

विजय शिंदे

नव्या पिढीला नात्यांची ओळख, ज्येष्ठांना आपुलकीचा सहवास; विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी स्नेहसंमेलन रंगले

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस भौतिक सुखाच्या मागे धावत असताना नातीगोती, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील चार पिढ्यांना एकत्र आणत नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मनोज जगदाळे यांच्या निवासस्थानी सराटी येथे भव्य कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्नेहसंमेलनासाठी आईकडील चार पिढ्यांमधील सर्व नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते. मामा-मामी, त्यांची मुले-मुली, मावश्या, काका, मावसभाऊ, वहिनी, भाचे-भाच्या अशा सर्व नातेवाईकांनी आवर्जून उपस्थिती लावत या स्नेहसंमेलनाला कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले.

केवळ एकत्र जमणे एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश नव्हता, तर नवीन पिढीला नात्यांची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये नातेवाईकांविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी, तसेच प्रत्येकाला आपल्या माणसांसाठी वेळ देता यावा, हा या आयोजनामागील मुख्य हेतू होता.

या स्नेहसंमेलनात लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या, प्रश्नमंजुषा यांसारख्या मनोरंजनात्मक स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत आणली. लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तर महिलांनाही रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस स्वतःसाठी आनंदाने घालवता यावा, या भावनेतून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामुळे चार पिढ्यांतील नातेवाईकांना एकत्र येण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि नवीन पिढीला कौटुंबिक नात्यांचे महत्त्व समजावून सांगण्याची अनोखी संधी मिळाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मावसभाऊ आणि नातेवाईकांनी आपापल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थिती लावली. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कौटुंबिक सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पडला. याबद्दल मनोज जगदाळे यांनी सर्व नातेवाईकांचे मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी मनोज जगदाळे यांनी व्यक्त केलेला विचार विशेष लक्षवेधी ठरला. ते म्हणाले, “जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आले पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्या माणसांना विसरता कामा नये. आपण दुसऱ्यांना प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची वागणूक दिली, तर आपल्यालाही तशीच वागणूक मिळते. अशा कौटुंबिक स्नेहसंमेलनांची आज समाजाला खरी गरज आहे. अशा उपक्रमांमुळे माणुसकी जिवंत राहते आणि नात्यांमधील प्रेम अधिक दृढ होते.”

आजच्या काळात नाती जपण्याचा आणि चार पिढ्यांना एकाच छताखाली आणण्याचा सराटीतील हा कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button