इंदापूरच्या संघर्षाला नवे वळण, आपल्या जीवाला तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला धोका, कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव.

२५ नोव्हेंबरच्या मोर्चापूर्वी आरोपांची धार तीव्र; पोलीस संरक्षण देण्याची पुणे पोलीस अधीक्षकांकडे मागणी
इंदापूर | विजय शिंदे
इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यापासून आपल्या जीवाला तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला धोका असल्याचा गंभीर आरोप भाजपचे पुणे जिल्हा महामंत्री डॉ. आकाश कांबळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पोलीस यंत्रणेकडे १९ नोव्हेंबर रोजी निवेदन देत तहसीलदारांवर फौजदारी कारवाई करण्याची तसेच स्वतःला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
इंदापूर तहसील कार्यालयातील कथित गैरकारभार आणि तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात डॉ. कांबळे यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दे उपस्थित केले होते. तसेच २५ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात इंदापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याविरोधात आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
ग्रामविकास विभागाशी संबंधित २०१९ मधील एका प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विषय निरंक असल्याचे कळविलेले असतानाही तब्बल सात वर्षांनंतर दंड आकारून बोजा चढविण्याची कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धती आणि कथित भ्रष्टाचाराबाबत वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे विभागीय आयुक्तांना विशेष पथकामार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. या चौकशीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री. निराळे यांच्यामार्फत चौकशी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
चौकशीचे आदेश दिल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर विविध मार्गांनी दबाव आणला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तसेच आपल्यावर आणि कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची भीती असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
डॉ. आकाश कांबळे यांचा विविध ठिकाणी प्रवास असतो. त्यामुळे आपली आणि कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुणे पोलीस अधीक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
२५ नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांविरोधातील आरोपांनी इंदापूरच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या गंभीर आरोपांवर तहसीलदार प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.



