Uncategorized

विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या दहा मल्लांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

विजय शिंदे

पै. कृष्णा हरणावळची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड; ६५ किलो वजनगटात सुवर्णपदकाची कमाई

इंदापूर : तालुक्यातील शिरसोडी येथील विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या मल्लांनी कुस्ती आणि ज्युदो या क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. केंद्रातील दहा मल्लांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, पै. कृष्णा हरणावळ याची आगामी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या यशामुळे विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विद्यापीठस्तरीय स्पर्धेत मल्लांची दमदार कामगिरी

विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई करत विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या मल्लांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये पै. कृष्णा हरणावळ (६५ किलो), पै. हर्षल फडतरे (८२ किलो), पै. ओम कचरे (८६ किलो) आणि पै. सुशांत देवमाने (८६ किलो) यांचा समावेश आहे. या मल्लांनी आपल्या वजनगटात प्रभावी कामगिरी करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेतही यश

वाशिंबे, ता. करमाळा येथे झालेल्या शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेतही विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या मल्लांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या पै. सौरभ वीरकर (७० किलो), पै. समाधान कोकाटे (६५ किलो), पै. सतीश सूर्यवंशी (६१ किलो), पै. सतेज दळवी (६३ किलो) आणि पै. ओम घोडके (५२ किलो) यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ज्युदो स्पर्धेत संस्कार सावंतला सुवर्णपदक

कुस्तीबरोबरच ज्युदो या क्रीडा प्रकारातही विघ्नहर्ता कुस्ती केंद्राच्या मल्लाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत पै. संस्कार सावंत याने २५ किलो वजनगटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कृष्णा हरणावळची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

विघ्नहर्ता कुस्ती केंद्राचा मल्ल पै. कृष्णा हरणावळ याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजनगटात दमदार कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय चॅम्पियन हरियाणाचा मल्ल जगदीश याच्याविरुद्ध झालेल्या लढतीत कृष्णाने ८-१२ गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची आगामी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा चंदीगड येथे होणार आहे.

विघ्नहर्ता कुस्ती केंद्रातून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने कृष्णा हरणावळ याच्या यशाचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.

प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यशाला गवसणी

या सर्व यशस्वी मल्लांना विघ्नहर्ता कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक तथा राष्ट्रीय कुस्ती पंच पै. दत्ता गावडे आणि केंद्राचे संस्थापक वस्ताद पै. अशोकभाऊ चोरमले यांचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे मल्लांनी हे यश संपादन केल्याचे सांगण्यात आले.

या यशस्वी मल्लांचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजीराव कोळी, विघ्नहर्ता कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक पै. प्रकाश अण्णा शिंदे आणि कुस्ती मार्गदर्शक पै. अशोक चोरमले यांनी अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्व मल्लांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button