इंदापूर तालुका काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली! मयूरसिंह पाटील यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा

विजय शिंदे
निवास शेळके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती; भाजपमधून आलेल्या मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
इंदापूर : इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष निवास शेळके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधान परिषदेचे सभागृह नेते सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर इंदापूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
मयूरसिंह पाटील हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि इंदापूरचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला इंदापूरच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मयूरसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुका काँग्रेसला तरुण आणि आक्रमक नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, निवास शेळके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावरही नवी जबाबदारी सोपवली आहे.
भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या मयूरसिंह पाटील यांच्याकडे आता तालुक्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्याचे आव्हान असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका काँग्रेसची पुढील वाटचाल कशी राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



