जमिनीच्या वादातून जन्मदात्या पित्याला दोन्ही मुलांकडून भर रस्त्यात मारहाण; इंदापूरात धक्कादायक घटना

विजय शिंदे
इंदापूर : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरानजीक जमिनीच्या वादातून एका वृद्ध पित्याला त्यांच्याच दोन मुलांनी भर रस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इंदापूर शहराजवळील सलीम लॉन्स परिसरात घडली असून, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणी ६५ वर्षीय तुकाराम किसन राऊत यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुलगा संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम राऊत यांनी त्यांच्या पत्नी अंजना राऊत यांच्या नावावरील जमीन विक्री केली होती. याच कारणावरून मुलांनी वडिलांकडे जाब विचारला. त्यानंतर झालेल्या वादातून दोन्ही मुलांनी हातातील लाकडी दांडक्याने वृद्ध वडिलांना रस्त्यावरच मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, वृद्ध पित्याला मुलांकडून झालेल्या मारहाणीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.



